‘ह्या’ तालुक्यात बोगस कांदा बियाणे फॅक्टरी;कृषी विभागाने केली ‘ही’ कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंद्यात बोगस कांदा बियाणे बेकायदेशीर पद्धतीने साठवणुक करणे, परस्पर एका खाजगी कंपनीच्या बॉक्समध्ये सीलबंद करुन विक्रीसाठी खाजगी विक्रेते व शेतकर्‍यांना वितरीत करणार्‍या फॅक्टरीवर धाड टाकत कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे.

जिल्ह्यात अशा प्रकारे बोगस कांदा बियाणे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला असून यामुळे शेतकर्‍यांची मोठी फसवणूक टळली आहे. मांडवगण येथून अमोल प्रकाश धबागडे (मुळगाव यवतमाळ, हल्ली मुक्काम माडंवगण) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांद्याचे दर वाढायला लागले असून, २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा आता चक्क ७० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. राज्यातील कांद्याची स्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांदा शंभरी गाठणार असल्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. परतीच्या पावसाचा फटका कांद्यालाही बसला असल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अती पावसामुळे वाया गेलेले कांदा पीक व रोपे त्याचा परिणाम तालुक्यात कांद्याच्या बियाणास व रोपांना मोठी मागणी वाढली आहे.

त्यामुळे तालुक्यात कांदा बियाणांच्या व रोपांच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी बोगसबियाणे विकणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची शक्यता आहे. कांदा बियाणे टंचाईचा फायदा घेत बोगस कांदा बियाणे विक्री करणार्‍या विरोधात कृषी विभाग आक्रमक झाला आहे.

मांडवगण कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्त पथकाने (दि.28) रोजी छापा टाकून विराट ऐग्रो इनपुट, जालना या कंपनीच्या कांदा बियाण्याचे 500 ग्रॉम वजनाचे 80 पाकीट (बॉक्स), 70 किलो सुट्टे कांदा बियाणे,

कांदा बियाणे पाकीट आणि बॉक्स सिलीग करण्याचे मशीन, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या ईत्यादी असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24