अहमदनगर बातम्या

रस्त्यावरील खडीवरुन बोलेरो निसटली अन् चौघा तरुणांसह विहिरीत बुडाली

Published by
Sushant Kulkarni

१६ जानेवारी २०२५ जामखेड : रस्त्यावर टाकलेल्या खडीवरुन चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे खडीवरुन ही निसटलेली ही बोलेरो थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली.या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना बुधवारी दि.१५ सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी येथे घडली.

रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर अशी मयत तरुणांची नावे आहेत.जामखेड जामवाडी या रस्त्याने बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बोलेरो या चारचाकी वाहनाने रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर हे तरुण जामखेडकडे येत होते.या रस्त्याचे काम चालू असल्याने त्यावर खडी टाकलेली होती.

या खडीवरुन वाहन चालवित असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् हे वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळले.रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी ही घटना पाहिली.त्यांनी तातडीने जामवाडी येथील ग्रामस्थांना बोलावून घेतले.सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पोलिस स्टेशनला (फोन करून सांगितले) माजी सरपंच कैलास माने, रमेश आजबे यांनी कठडा व पायऱ्या नसलेल्या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरले व त्यांनी चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले.

यावेळी तेथे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवून नियोजन केले.सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले.त्यानंतर हे चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni