अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील प्रभावीपणे सुरु आहे.
यातच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या लसीकरणामध्ये प्रामुख्याने व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झाले असतील त्यांना आधी घेतलेल्या लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
तसेच नियमाप्रमाणे आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांनाही हा बूस्टर डोस दिला जाणार आहे. दरम्यान देशासह राज्यात ओमिक्रॉनचा वाढत्या प्रादुर्भावामुळे करोनाच्या तिसर्या लाटेचा धोका असल्यामुळे शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे.
आता बूस्टर डोस देण्याचीही तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 60 वर्षांपुढील नागरिकांना व त्यातही ज्यांना रक्तदाब, मधूमेह अशा व्याधी आहेत अशांना बूस्टर दिला जाणार आहे.
दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील अशांनाच बूस्टर डोस मिळणार आहे. जिल्ह्यात 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटात असलेले व्याधीग्रस्त 1 लाख 14 हजार 667 जण आहेत. त्यांना सोमवारपासून नियमाप्रमाणे बूस्टर मिळणार आहे.