Ahmednagar News : एका पतसंस्थेवर असलेल्या प्रशासकाच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष मघाजी चोथे (वय ५५, रा. चोथे वस्ती, टाकळीमियाँ) हे मंगळवारी (दि.९) रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान बाहेर जाऊन येतो, असे सांगुन घरातुन बाहेर पडले होते.
काल सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान हे त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
या घटनेबाबत मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी सांगितले कि, सुभाष चोथे यांनी एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज परत भरण्यासाठी वसुली अधिकारी व प्रशासक यांनी सुभाष चोथे यांच्याकडे अनेकदा तगादा लावला होता.
सुभाष चोथे यांनी सुमारे एक वर्षापूर्वी त्यांचे २ लाख ३५ हजार रुपये कर्ज भरले. सदर कर्ज भरेपर्यंत वसुली अधिकारी व प्रशासकाने तुम्ही कर्ज भरल्यानंतर तुम्हाला संस्थेचा निल दाखला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र कर्ज भरून घेतल्यानंतर याच अधिकाऱ्यांनी तुम्ही दुसऱ्या कर्जदाराला जामीन आहे, त्या कर्जदाराचे पण कर्ज भरा.
त्यावेळी तुम्हाला नील दाखला देण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. सुभाष चोथे यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे नील दाखला मिळण्यासाठी विनवणी केली. तरीपण अधिकाऱ्यांनी त्यांना निल दाखला दिला नाही.
कर्ज भरुन देखील पतसंस्थेकडून निल दाखला मिळत नसल्याने चोथे हे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. याबाबत त्यांनी नातेवाईकांना देखील सांगितले होते. सदर पतसंस्थेवर प्रशासक म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून सुभाष चोथे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बाळासाहेब चोथे यांनी केली आहे.