अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 8-9 महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर होणारे उपचार व विभाग बंद करण्यात आले होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हे सर्व विभाग पुर्ववत सुरु करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भिंगार शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.सौ.कांता बोठे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांना दिले.
दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे गरीब घरातील आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करणारे इतर विभाग बंद करण्यात आले होते.
त्यामुळे येथे आलेल्या रुग्णांना शहरातील इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात. त्यामुळे या रुग्णांच्या पैशाचा व वेळेचा अपवय होतो.
सदर रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी जिल्हा रुग्णालयातील बंद असलेले सर्व विभाग व सोयी-सुविधा पूर्ववत सुरु कराव्यात,
असे निवेदनात नमूद करुन जेणे करुन गरीब रुग्णांना उपचार मिळणे सुलभ होईल. असे सौ.कांता बोठे यांनी म्हटले आहे. याबाबत डॉ. पोखरण म्हणाले कि,
जिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग तसेच सेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहे. पुढील काळातही शासनाच्या निर्देशानुसार सर्वच विभाग सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.