शिर्डी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सध्या लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. तरीही भल्या सकाळी मॉर्निंगवॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शंभराहुन अधिक नागरिकांवर शिर्डी पोलीस व नगरपंचायत यांनी संयुक्त कारवाई केली.
सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत सर्वांना दीड तास कवायत करायला लावली. दंड आकारल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. शिर्डीत मॉर्निंगवॉकसाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत असतात.
त्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा व नगरपंचायत यांनी संयुक्तरित्या पथक तयार करुन द्वारका सर्कल येथे नाकाबंदी केली. यावेळी १०० जणांवर कारवाई करण्यात आली.
यात दहा महिलांचा समावेश होता. पोलिसांनी प्रत्येकी २०० तर नगरपंचायतने ५०० रुपयाची दंड आकारणी केली. तसेच सर्वांना दीड तास कवायत करण्यास लावले.
याशिवाय अत्यावश्यक कामाच्या नावाखाली फिरणाऱ्या १० जणांच्या मोटारसायकल जप्त करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.