भैय्या.. जनसामान्यांचे असामान्य नेतृत्त्व..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले समाजकारण आणि हिंदुत्त्वाचे शिवधनुष्य आयुष्यभर पेलणारे शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अनिलभैय्या राठोड आज आपल्यात नाहीत.

त्यांच्या निधनाने संपूर्ण शिवसेना परिवाराने तसेच नगरकरांनी एक सर्वसामान्यांमधील असामान्य नेता गमावला आहे. एका झंझावाती पर्वाची अखेर झाली. परंतु, जाताना ते एक विचार सर्वांसाठी ठेवून गेले तो म्हणजे हिंदुत्त्वाचा व सर्वसामान्यांच्या अविरत सेवेचा.

हा विचारच पुढे चालवणे व शिवसेनेच्या भगव्याशी कायम प्रामाणिक राहणे हीच अनिलभैय्यांसाठी आमची सर्वात मोठी श्रध्दांजली ठरेल. मला वैयक्तिक समाजकारणाचे बाळकडू आमच्या वडीलांकडून मिळाले. माळीवाडा परिसरात माझे वडील समाजकारणातील मोठे प्रस्थ होते.

याच काळात नगरच्या राजकीय पटलावर अनिलभैय्या हे नाव कायम चर्चेत असायचे. त्यांची नेतृत्त्वशैली, तरूणाईचा त्यांच्याकडे असलेला ओढा यामुळे त्यांच्याबाबत मनात एक प्रकारचे आकर्षण होते. यातच 2006 च्या सुमारास शिवसेनेत मोठी फूट पडून 10 नगरसेवक बाहेर पडले.

नगरमधील शिवसेनेसाठी हा कठिण प्रसंग होता. मात्र अनिलभैय्या या परिस्थितीत डगमगले नाहीत. सर्वसामान्यांचे प्रेम व विश्वास शिवसेनेच्या भगव्यावर आहे. तसा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला. याच काळात मी स्वत: अनिलभैय्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

पक्षात प्रवेश करतानाच त्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावर शहरप्रमुखपदाची जबाबदारीही सोपवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शहरप्रमुखपद मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. या पदाला अनिलभैय्यांच्या नेतृत्त्वाखाली, मार्गदर्शनाखाली पुरेपुर न्याय देणारे काम करायचे हे मी तेव्हाच ठरवले होते.

या काळात अनिलभैय्यांची कार्यपध्दती, लोकांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी खूप जवळून अनुभवली. सर्वसामान्य नगरकर हा त्यांच्या कायम केंद्रस्थानी असायचा. आपण जनतेला बांधिल आहोत. त्याचपध्दतीने आपले आचरण असले पाहिजे.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनुसार राजकारणापेक्षाही समाजकारणावर भर दिला पाहिजे, अशी शिकवण ते कायम द्यायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसंग कितीही कठीण आला तरी त्याला तोंड द्यायचे व त्यावर मात करायची जिद्द त्यांच्यात होती. अक्षरश: भारावून टाकणारे त्यांचे विचार खूप ऊर्जा द्यायचे.

आपल्या तत्वांशी, स्वाभिमानाशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. हिंदुत्त्व हे तर त्यांच्यासाठी सर्वस्व होते. निवडणुकीवेळी अनेकांकडून मतांच्या राजकारणासाठी तत्व बाजूला सारली जाते. अनिलभैय्या त्याला अपवाद होते. राजकीय फायद्यातोट्यापलिकडे जावून त्यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका जपली.

सर्वसामान्यांसाठी तर अनिलभैय्या हे हक्काचे आधारस्तंभ होते. कोणतीही अडचण असो, प्रशासनाशी संबंधित प्रश्न असो, त्याच्या सोडवणुकीसाठी लोकं विश्वासाने अनिलभैय्यांकडे धाव घ्यायचे. आपल्याकडे काम घेवून, अडचण घेवून आलेला कोण आहे? तो कोणत्या विचारधारेचा आहे, त्याची जात कोणती आहे असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही.

जो आपल्याकडे अपेक्षेने आला, त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका असायची. हिच त्यांच्या लोकप्रियतेची गुरुकिल्ली होती. अनिलभैय्यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक जीवनात कसे काम करायचे याचे धडे आम्हाला मिळाले. जनहिताच्या प्रश्नावरील त्यांची आंदोलने म्हणजे कार्यशाळाच असायची.

सर्वसामान्यांचा आवाज बनून ते अक्षरश: वाघासारखे काम करून प्रश्नाची तड लावायचे. अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवायचे. अपप्रवृत्तींपासून नगरकरांना अविरत संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे ते फक्त नगर शहरच नाही तर जिल्ह्यात तसेच राज्यातही नावाजले जायचे.

महागाई, वीजेचे प्रश्न अशा प्रश्नांवर त्यांनी असंख्य आंदोलने केली. नगरकरांना चांगल्या नागरी सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीही त्यांनी महानगरपालिकेला जाग आणणारी आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनाची स्टाईल, त्यांच्या कामाचा धडाका, अविरत जनसेवा आमच्या सर्वांसाठी मोठी शिदोरी आहे.

शिवसेनेत त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करीत असतानाच माझ्या पत्नीला सौ.सुरेखा कदम यांना पक्षाकडून महापौरपदाची संधी मिळाली. यात अनिलभैय्या राठोड, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांचा सिंहाचा वाटा होता. महानगरपालिकेत शिवसेनेच्या सत्तेच्या माध्यमातून नगरकरांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळायला हव्यात यावर त्यांचा भर असायचा.

त्यादृष्टीने ते कायम योग्य मार्गदर्शन करायचे. सर्वसामान्यांसाठी अख्खे आयुष्य व्यतित करणारे अनिलभैय्या आमच्यासाठी कायम एक प्रेरणास्थान राहतील. त्यांच्या स्वप्नातील सुरक्षित, भयमुक्त व विकसित नगर शहर घडवण्याचे कार्य आम्ही भविष्यातही चालूच ठेवू. जनसामान्यांच्या या असामान्य नेतृत्त्वाला भावपूर्ण श्रध्दांजली..

– संभाजी कदम
माजी शहरप्रमुख,
शिवसेना, नगर शहर

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24