Ahmednagar News : सध्या ग्रामीण भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहटे गावात एकाच रात्रीत विविध परिसरात पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या. या चोरीच्या घटनेत एका महिलेला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या चोरीच्या घटनांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये चोरीचे सत्र वाढत आहे. मीरा देवराम आंधळे, महादेव रामभाऊ दहिफळे, सावळेराम रणमले, कमल मारुती डोंगरे व इतर एक ते दोन ठिकाणी चोरी व चोरीचा प्रयत्न झाला.
पाथर्डी पोलिसांत मीरा आंधळे यांनी घरफोडीची फिर्याद दाखल केली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि. ४ जुलैला सकाळी आंधळे यांना फोन आला की, तुमच्या घराचे दरवाजे उघडे असून कुलूप पडलेले आहे.
त्यानंतर सायंकाळी आंधळे घरी आल्या असता त्यांना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील सुमारे दोन तोळ्याचे दागिने व नऊ हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले.
अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कापून घरात प्रवेश केला. त्याचप्रमाणे परिसरात चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून त्यातही ऐवज चोरीला गेला आहे. त्याचा मात्र तपशील मिळू शकला नाही.
एका चोरीच्या घटनेत चोरट्यांनी एका महिलेला घराच्या बाहेरून चाकूचा धाक दाखवून धमकावले. परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
येथील नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे. मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.तसेच रझाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशीचोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या अशा प्रकारांमुळे या भागात बाहेरून येणारे भाविकांच्या संख्येवर देखील परिणाम होत आहे.