अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव करीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ८५ टक्के ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी गेली २५ वर्षे विकास कामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला असल्याने हा सर्वसामान्यांचा विजय असल्याचे भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी सांगीतले.
कर्डिले पुढे म्हणाले की, बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होत होती. मात्र फक्त विरोधासाठी विरोध करणारांनी ही लादलेली निवडणुक बुऱ्हाणनगरकरांनी परतवून लावीत मुठभर विरोधकांचे डिपॉझीट जप्त केले.
समाजात कवडीची किंमत नसणाऱ्यांनी आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप केले, त्यांना जनतेने मतपेटीच्या माध्यमातून सणसणीत चपराक दिली असल्याचे अक्षय कर्डिले यांनी विजयोत्सवाच्या वेळी सांगीतले.
जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवून सेवेची त्यास आम्ही पात्र ठरून जनतेची आणखी जोमाने सेवा करू असे अक्षय कर्डिले म्हणाले.