Business Success Story:अडचणींवर मात करत ‘या’ उच्चशिक्षित तरुणाने सुरू केले गुऱ्हाळघर! गुळविक्रीतून करत आहे लाखोंची उलाढाल, वाचा यशोगाथा

Pragati
Published:

Business Success Story:- आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर मिळवायची असेल तर त्याकरिता कष्ट हे लागतातच. अगदी आरामात कुठलीही गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळत नसते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नसतो व ठरवलेले ध्येय पूर्ण करताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी पुढे न झुकता खंबीरपणे अडचणींवर मात करत मार्गक्रमण करणे खूप गरजेचे असते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण दौंड तालुक्यातील केडगाव येथील अमोल मेमाने यांची यशोगाथा पाहिली तर ती नक्कीच इतर तरुणांना प्रेरणादायी आहे. अमोल मेमाने यांनी गुऱ्हाळघर सुरू केले व या व्यवसायामध्ये त्यांना आई-वडील तसेच बहिणीचा खूप मोठा पाठिंबा मिळाला व त्यांच्या मार्गदर्शनाने अमोल यांनी या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे.

अमोल मेमाने यांची यशोगाथा

अमोल मेमाने यांनी 2009 मध्ये पुण्यातून कम्प्युटरमध्ये पदविका उत्तीर्ण केली. त्यानंतर कॉम्प्युटर क्षेत्रामध्येच करिअर करावे या उद्देशाने केडगाव येथे मेमाने कम्प्युटर नावाने व्यवसायाला सुरुवात केली. परंतु या क्षेत्रामध्ये त्यांचे मन रमले नाही व काहीतरी वेगळा व्यवसाय करावा असं त्यांच्या मनात सुरू होते.

व्यवसायांची चाचपणी सुरू असताना गुऱ्हाळ घराची आवश्यकता त्यांना वाटली व त्यातूनच त्यांनी गुऱ्हाळघर सुरू करण्याचे ठरवले. गरजांच्या पाठिंबा आणि मार्गदर्शन घेत त्यांनी हा व्यवसाय उभारला व परप्रांतीय गुऱ्हाळ उद्योजकांची या क्षेत्रातली मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी ऊस खरेदी पासून तर गुळाचे उत्पादन व विक्री या तिन्ही आघाड्यांवर सक्षमपणे काम करायला सुरुवात केली व त्यांचा हा उद्योग यशाच्या शिखराकडे नेला.

अशा पद्धतीने यशस्वी केला व्यवसाय

आपल्याला माहित आहे की, कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली म्हणजे त्यामध्ये अगोदर मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात व अगदी याच प्रमाणे व्यवसायाच्या सुरुवातीला अमोल यांना देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. इतकेच नाही तर सुरुवातीला व्यवसायामध्ये पडझड देखील झाली व अनेक चढउतार आले. परंतु या सगळ्या गोष्टींना खंबीरपणे तोंड देत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला.

परिस्थितीनुसार माणसाने बदलले पाहिजे असे म्हटले जाते व याच मुद्द्याला धरून या व्यवसायातील आधुनिकता मेमाने यांनी ओळखली व अत्याधुनिक यंत्रे खरेदी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जर प्रश्न पाहिले तर उसाचे उत्पन्न जेव्हा जास्त प्रमाणात होते तेव्हा विक्री करणे खूप कठीण आणि जिकिरीचे होते.

बऱ्याचदा शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर विक्री होत नाही व शेतात बऱ्याच कालावधीपर्यंत ऊस उभा राहिल्यामुळे त्याच्या वजनात घट येते व आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. परंतु अमोल मेमाने यांनी विक्रीचे योग्य व्यवस्थापन केले व आर्थिक गोष्टींवर मात करत ज्या ज्या शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करतात त्यांना वेळेवर पैसे उपलब्ध करून देतात व त्यामुळे शेतकऱ्यांचा देखील त्यांच्यावर विश्वास आहे.

आज अमोल हे त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास शंभर लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असून तेलंगणा तसेच गुजरात व कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्या गुऱ्हाळ घरात तयार झालेल्या गुळाची निर्यात देखील ते करत आहेत.

तसेच त्यांनी विदर्भ व मराठवाडा या ठिकाणी देखील उच्च प्रतीच्या गुणवत्तापूर्ण गुळनिर्मिती केल्यामुळे मागणीत देखील वाढ झालेली आहे व केडगाव परिसरातून देखील त्यांना शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस देतात.इतकेच नाही तर शिरूर तालुक्यातील नागरगाव व रांजणगाव तसेच चिंचणी सारख्या भागातून देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून ऊस उपलब्ध होतो.

या आहेत भविष्यातील योजना

अमोल हे भविष्यामध्ये लक्ष्मी गुळ उद्योग समूहाच्या माध्यमातून सेंद्रिय गुळ निर्मिती करणार असून विषमुक्त गुळ निर्मिती प्रक्रिया उद्योग उभारून परदेशात मागणीनुसार तो गूळ पाठवणार आहेत. इतकेच नाही तर येणाऱ्या काळामध्ये उसापासून सेंद्रिय काकवी तसेच चिक्की,रस इत्यादी उसाचे उपपदार्थ तयार करून ग्राहकांच्या पसंतीनुसार अनेक प्रकारचे प्रॉडक्ट ते आता उसापासून बनवणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe