अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- मदत व पुनर्वसन खात्याने 2019 ला आलेल्या महापुरामुळे कोपरगाव शहरातील बाधित झालेल्या व्यावसायिकांना 95.40 लाखांची मदत जाहीर केली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
दरम्यान 2019 ला कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना आलेल्या महापुराच्या पाण्याचा फटका बसून या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काळे यांनी पाठपुरावा केला होता. ऑक्टोबर 2019 मध्ये संपूर्ण कोपरगाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
तसेच धरण क्षेत्रात देखील मोठ्याप्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. या महापुराचे पाणी कोपरगाव शहरात शिरल्यामुळे अनेक दुकानदार, टपरीधारक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी जाऊन त्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी त्यावेळी प्रशासनाला दिल्या होत्या. या व्यावसायिकांना देखील नुकसानभरपाई मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन खात्याकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा काळे यांनी केली होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.
नुकसानग्रस्त व्यावसायिकांना शासनाकडून 95 लाख 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केले आहे.