धर्माच्या नावावर राजकारण करुन, संघ प्रणाली देशावर लादली जात आहे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-शेतकरी, घरकुल वंचित व युवकांचे प्रश्‍न न सोडवता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारचा निषेध नोंदवत पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे टंगळ-मंगळ मोदी, कारभार अनागोंदी राज्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अंबिका नागूल, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, संतोष लोंढे, संजय स्वामी, फरिदा शेख, सुशील देशमुख आदी उपस्थित होते. एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात आपला देश जाती, धर्मावर आधारित कालबाह्य व्यवस्थेचा स्विकारुन त्या पध्दतीने राज्य करीत आहे.

उन्नतचेतना व लोकभज्ञाक तंत्रापासून मोदी सरकार दूर असल्याने देशातील ज्वलंत प्रश्‍नावर टंगळ-मंगळ पध्दतीने कार्य केले जात आहे. देशात वाढत चाललेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या, घरकुल वंचितांची ससेहोलपट, जातीय व्यवस्थेमुळे अल्पसंख्यांक समाजावर होत असलेला अन्याय,

स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणुक, युवकांची बेरोजगारी हे प्रश्‍न अत्यंत गंभीर होत चालले आहे. सदर प्रश्‍न सोडविण्यास केंद्र सरकार अपयश ठरत असून, हुकमशाही पध्दतीने राज्यकारभार चालू असल्याची प्रचिती सर्वसामान्यांना येत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

अहमदनगरसह इतर शहरालगत मोठ्या प्रमाणात पड जमीन उपलब्ध आहेत. अशा जमीनींवर वीज, पाणी व रस्ते या मुलभूत सुविधा निर्माण करुन घरकुल वंचितांना स्वस्तात घरे देणे शक्य आहे. मात्र राज्य सरकार याबाबत उदासिन असल्याची खंत घरकुल वंचितांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

केंद्र सरकारने देशातील घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेद्वारे घर देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र घरकुल वंचितांचा प्रश्‍न कोणत्याही प्रकारे सोडविण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्य लोकांच्या प्रश्‍नांपासून दूर आहेत. त्यांचा अजेंडा फक्त धर्माच्या नावावर भावनिक राजकारण करुन, संघ प्रणाली देशावर लादण्याचे कार्य केले जात आहे.

देशातील राज्यकर्ते उन्नतचेतनेपासून लांब राहिल्याने सर्वसामान्यांची प्रश्‍न प्रलंबीत राहिले. देशातील महाविद्यालय व विद्यापिठांची शिक्षणपध्दती कालबाह्य झाली असून, आधुनिक अशा शिक्षण पध्दतीचा स्विकार करण्याची गरज आहे. यातून सामाजिक क्रांती घडणार असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24