अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-शेतकरी तसेच कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनांसह कामगार संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. तसेच केंद्राने लागू केलेले जुलमी कायदे रद्द करावे यासाठी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.
शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटना यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला २५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
हा संप जिल्ह्यात यशस्वी होईल, असा विश्वास हमाल पंचायतचे अध्यक्ष-अविनाश घुले यांनी व्यक्त केला. तसेच या देशविरोधी धोरणांच्या विरोधी आंदोलनात औद्योगिक कामगार यांच्या बरोबरीने बिडी कामगार आयटक व इंटक यामध्ये सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात मार्केट कमिट्या बरखास्त करण्याचा कायदा रद्द करावा, माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. इत्यादी मागण्यांसाठी माथाडी कामगार सहभागी होणार आहेत, तर पतसंस्था कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे यासाठी पतसंस्था कर्मचारी आंदोलनात सामील होणार आहेत.
शहरात एमआयडीसीमध्ये सरकारी कामगार हॉस्पिटल निर्माण झाले पाहिजे, किमान वेतन मिळाले पाहिजे, चार श्रमसंहिता रद्द करा या मागण्यांसाठी औद्योगिक कामगार या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत, असे कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी सागितले.
त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा, कायमस्वरूपी कामांमध्ये कंत्राटीकरणाला मज्जाव करा, या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते रावसाहेब निमसे यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved