लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो – आमदार बाळासाहेब थोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची मुंबईत दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपचा पराभव करणे, हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरू. सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे.

जनता द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र आहे, असा दावा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपवशी ठरले आहे.

शेतमालाला भाव नाही. भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली, पण अद्यापही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले, पण जाचक अटींमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही.

शेतकरी कर्जबाजारी झाला आमहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि सरकार मात्र मोठमोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. सरकारकडून लोकांना काय तरी मिळेल अशी आशा होती, मात्र केवळ पोकळ घोषणा करण्यात आल्या.

अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व्हावा हे आमचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या दोनदिवसीय बैठकीची शनिवारी सांगता झाली.

या दोन दिवसात ४१ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील सहा व चंद्रपूर मतदारसंघाचा आढावा लवकरच स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे. बैठकीतील चर्चा सकारात्मक झाली असून जास्तीत जास्त मतदारसंघांतून काँग्रेस पक्षाने लढावे, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद सर्व मतदारसंघांत आहे.

काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून जनतेचा काँग्रेसवरचा विश्‍वास आणखी दुढ झाला आहे. आजच्या आढावा बैठकीनंतर लवकरच महाविकास आघाडीची बैठकही होईल व त्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. आघाडीत सर्व पक्ष चर्चा करून जागा वाटपावर निर्णय होईल. भाजपचा पराभव करणे हाच आमचा निधीर आहे.