अहमदनगर बातम्या

गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; ‘त्या’ मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द होणार?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News: वैद्यकीय परवानगीशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडल्याप्रकरणी सावेडीतील मेडिकल एजन्सीचालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. पंकज कॉलनी, टीव्ही सेंटर, सावेडी) याच्यासह हरियाणातील औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नितीन बोठे याच्याकडे श्रीराम मेडिकल या नावे परवाना आहे. दरम्यान या मेडिकल एजन्सीचा पत्ताही बोगस निघाला असून, टीव्ही सेंटर येथील घरातूनच तो हा कारभार करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

यामुळे औषध प्रशासनाने त्याच्या मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याला यासंदर्भात नोटीस बजावली आहे. आपला मेडिकल एजन्सीचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये? याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बोठे याला देण्यात आली असल्याचे सहा. आयुक्त ज्ञानेश्‍वर दरंदले यांनी सांगितले.

दरम्यान बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावरील साठा नगर शहरात आल्याने खळबळ उडाली आहे. सावेडी भागातील श्रीराम मेडिकल एजन्सीचे यात पुढे आल्याने प्रामुख्याने सावेडीतूनच या गोळ्यांचा पुरवठा केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, मोठ्या रॅकेटचा यातून पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बोठेच्या एजन्सीचा पत्ताही बोगस निघाला असून, टीव्ही सेंटर येथील घरातूनच तो हा कारभार करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी बोठे हा पसार झाला असून, एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर आहेत.

एमआयडीसीतील व्हीआरएल लॉजिस्टीक्स या ट्रान्सपोर्ट कंपनीत शनिवारी सकाळी औषध प्रशासन व पोलिसांनी कारवाई करत गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त केला. प्रत्येकी पाच गोळ्यांचे एक कीट याप्रमाणे नऊशे कीट जप्त करण्यात आले होते. थंडीतापाच्या गोळ्यांच्या वेष्टनात या गोळ्या आलेल्या आहेत. या साठ्याची किंमत साडेसात लाख रूपयांच्या आसपास आहे.

दरम्यान, औषध प्रशासनाने गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या फॉरेन्सीक लॅबकडे पाठविले व ज्याच्या नावे हा साठा आलेला होता, त्या सावेडीतील श्रीराम मेडिकल एजन्सीचालक नितीन बोठे याला एक दिवसात म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. बोठेने म्हणणे सादर केले असले तरी त्यात संदिग्धता आहे. त्यामुळे बोठे हा तपासात दिशाभूल करत असल्याचा संशय आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच बोठे पसार झाला आहे.

Ahmednagarlive24 Office