२२ जानेवारी २०२५ संगमनेर : कुत्रा अंगावर आल्याने झालेल्या अपघातामध्ये महिला जखमी झाल्याने या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चक्क शहरातील एका डॉक्टरांच्या पाळीव कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावाच्या शिवारातील नवशीचा मळा येथे ही जखमी महिला राहते.
या महिलेच्या घराजवळच डॉ. पानसरे हे राहावयास असून त्यांच्याकडे रॉट व्हीलर जातीचा पाळीव कुत्रा आहे.ही महिला दुचाकीवरून आपल्या मुलीला शाळेतून घेऊन घरी घेऊन येत असताना घराजवळ असलेल्या डॉ. पानसरे यांच्याकडील पाळीव कुत्रा महिलेच्या अंगावर आला.
कुत्रा अंगावर आल्याने या महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकल्या.या अपघातात या महिलेला मार लागून त्या जखमी झाल्या.महिलेने रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला.त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी डॉ. पानसरे यांच्या पाळीव कुत्र्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार गजानन वाळके करीत आहे.रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्या विरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.आरोपीमध्ये चक्क एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस याप्रकरणी नेमका काय तपास करतात,याकडे लक्ष लागले आहे.