लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करुन काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिन साजरा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणाराच’ अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या ठिकाणी केली. त्या ऐतिहासिक इमारत कंपनीतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नगर आणि भिंगार काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना देशाला स्वातंत्र्य आणि पुरोगामी विचार देण्याच्या उद्देशाने झाली.

स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस सक़्रीय होती, त्यात अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व केले. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आदि महान नेते काँग्रेसने देशाला लाभले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने देशात समानता आणि लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला.

राजकीय पक्ष म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने देशात बहुमताने सत्ता हाती घेऊन देशाला प्रगती पथावर नेले. आज पक्षाचा 135 वा वर्धापन दिन असून, पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.

पक्षाला गतवैभव प्राप्त करुन द्यावयाचे असेल तर प्रत्येकाने पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे वागून पक्षाची विचारसरणी तळागाळापर्यंत रुजविण्याचा प्रयत्न करायला हवा. समाज माध्यमातून काँग्रेस पक्षाची घोरणे आपण तळागाळापर्यंत पोहोचविली असली तरी आजची परिस्थिती उद्भवली नसती मात्र नेमके उलटे घडले.

विरोधी पक्षांनी समाज माध्यमांचा वापर करुन काँग्रेस पक्षाच्या विरोधी विषारी प्रचार तळागाळापर्यंत नेला, त्याचे परिणाम आज देश भोगत आहे. देशाला जर पुन्हा चांगले दिवस आणावयाचे असतील तर समाज माध्यमातून आपण जनसंपर्क वाढवायला हवा, असे मत पक्षाचे भिंगार अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांनी व्यक्त केले.

प्रारंभी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान यांनी स्वागतपण भाषणात काँग्रेस पक्षामुळे स्वातंत्र्य चळवळीत खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद, असे अनेक देशभक्त सक्रीय होते, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेसने त्या काळात हिंदू- मुस्लिम ऐक्य करुन ब्रिटीशांच्या विरोधात लढून स्वातंत्र्य प्राप्त केले.

या पक्षाच्या माध्यमातून हे ऐक्य आजही टिकून आहे. याप्रसंगी शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, राजेश बाठिया, अभिजित कांबळे, रजनी ताठे,आदिंची समयोचित भाषणे झाली. यावेळी विवेक येवले, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे, मार्गारेट जाधव, रवी सूर्यवंशी, सुभाष रणदिवे आदि उपस्थित होते.

प्रारंभी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजप्रणाम करुन पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाला पूर्वभैभव प्राप्त करुन देण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. संजय झोडगे यांनी आभार मानले. शेवटी वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

अहमदनगर लाईव्ह 24