अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या १०२ वा श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास शुक्रवारी सुरुवात झाली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली.
उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे साडेचारला श्रींची काकड आरती झाली. पहाटे ५ वाजता साई प्रतिमा व श्री साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य दिलीप स्वामी यांनी वीणा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी प्रतिमा हाती घेतली हाेती.
मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. कान्हूराज बगाटे यांनी प्रथम,
तदर्थ समितीचे सदस्य दिलीप स्वामी यांनी व्दितीय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तृतीय, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे
यांनी चौथा व प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले. सकाळी ६ वाजता समाधी मंदिरात रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व संगीता बगाटे यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली.
दुपारी साडेबाराला माध्यान्ह आरती झाली. दुपारी ४ वाजता कीर्तन झाले. सायंकाळी ६ वाजता धूपारती झाली. रात्री साडेदहाला श्रींची शेजारती झाली. रात्रभर श्री साईसच्चरित अखंड पारायण व्दारकामाई मंदिरात सुरू होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved