Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात नुकताच संपदा पतसंस्थेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश झाला. यातील अनेकांना जन्मठेप व काहींना इतर शिक्षा झाल्या.
दरम्यान अहमदनगर हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळख असतानाही या जिल्ह्यात असले प्रकार समोर येत आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी दोन पतसंस्थेमधील गैरकारभार देखील समोर आला आहे.
राहाता येथील स्वामीनी अर्बन मल्टीपर्पज निधीचे चेअरमन संतोष अर्जुन बुधवंत व धनश्री अर्बन मल्टिपर्पजच्या चेअरमन संगीता अर्जुन बुधवंत, संचालक अभिजीत संतोष बुधवंत हे ठेवीदारांचे सुमारे ७६ लाख रुपये घेऊन फरार झाले आहेत.
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाही अद्याप आरोपींना अटक नाही. ठेवीदारांचे पैसे घेऊन फरार झालेल्या या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी ठेवींदारांकडून होत आहे.
स्वामिनी अर्बन मल्टिपर्पज निधी, राहाता व धनश्री अर्बन मल्टिपर्पज निधीची राहुरी येथे शाखा आहे. स्वामिनी अर्बनचे चेअरमन संतोष बुधवंत व धनश्री अर्बनच्या चेअरमन संगीता बुधवंत या दोघा पती-पत्नीने
लोकांचा विश्वास संपादन करून चांगल्या व्याजदराचे अमिष दाखवून ठेवी ठेवायला सांगितले. जमा झालेली ठेवीदारांची ७६ लाखांची रक्कम घेऊन दोघेही फरार झाले आहेत. त्यांच्यावर राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जामीनासाठी त्यांनी कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपींनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता.
खंडपीठाने सुद्धा आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. चार महिन्यांपासून आरोपी फरार आहेत. दरम्यान, बँकेचे सर्व ठेवीदार वारंवार राहाता पोलिस ठाण्यात जावून आरोपींना पकडण्याची मागणी करत आहोत.
परंतु अद्यापही राहाता पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले नाही. या फरार आरोपींना त्वरित अटक करावे, अशी मागणी ठेवींदारांकडून होत आहे. यामध्ये काही माजी सैनिकांच्याही ठेवी आहेत.
त्यातील काही माजी सैनिक बोलताना म्हणाले की, आम्ही २५ वर्षे देशाची सेवा केली. सेवापूर्तीनंतर सेवेतून मिळालेली दहा लाखांची रक्कम राहाता येथील स्वामिनी अर्बन मल्टीपर्पज निधीत ठेव ठेवली.
सुरुवातीला त्यांनी आकर्षक व्याज देऊन आम्हाला आपलेसे केले. त्यानंतर त्यांनी व्याजासह रक्कम घेऊन आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.