Ahmednagar News : उचल घेतली मात्र मुकादम टोळी घेऊन उसतोडीला आलाच नाही, उचल न फेडताच पळ काढला, घेतलेली उचल परत केली नाही अशा घटना घडत असतात.
मात्र परजिल्ह्यातील मुकादमाने येथील टोळी मालकाला त्याच्या गावाकडे येऊन पळवून नेल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावातील टोळी मालक सुभाष बापु ठोंबरे हे आणि डोळे मुकदम आणि काही कामगार सोबत होते.
मात्र अचानक ऊस तोडणी पैशांच्या कारणावरून टोळी मुकादम उपेंद्र दिलीप मोरे (रा.पिंपरखेड ता.चाळीसगाव जि. जळगाव) याने चक्क टोळी मालकाच्या इलाख्यातून त्यांना पळवून नेल्याची घटना दि.२६ मे रोजी दुपारी घडली होती.
अपहरण झालेल्या टोळी मालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू असताना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना ठोंबरे हे सुरुवातीला नेवासा व नंतर पिंपरखेड येथे असल्याची बातमी मिळाली होती.
तात्काळ पथक रवाना करून तेथील स्थानिक पोलीस निरीक्षक संजय मेंढे व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने सुभाष ठोंबरे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी पळून गेले, त्यानंतर कर्जत पोलिसांनी ठोंबरे यांना कर्जत येथे आणुन नातेवाईकांच्या ताब्यात दिले.