अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- बदनामीची धमकी देत एकाला वीस लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे.
दरम्यान याप्रकरणी चौघांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अतुल प्रभाकर गायकवाड यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, शहरातील सारडा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आपली ‘देवा जीम’ या नावाने व्यायामशाळा आहे.
तेथे गौतम दगडू कदम हा नियमितपणे व्यायाम करण्यासाठी येत होता. तो गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे व्यायामशाळेत येऊनही पैसे देत नव्हता.
त्याच्याकडे पैसे मागितल्याचा राग येऊन तो व्यायामशाळेत यायचा बंद झाला. त्यानंतर कदम व अन्य अनोळखी तिघेजण यांनी आपणास रस्त्यात अडवून वीस लाख रुपयांची मागणी केली.
आपण त्यास नकार दिला असता गौतम कदम याने आपणास दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर असणार्या तिघांनी तुझ्या व्यायामशाळेत मुली घुसवून त्यांची चित्रफित तयार करून व्यायामशाळेत वेश्या व्यवसाय चालतो असे समाज माध्यमांवर टाकून तुझी व व्यायामशाळेची बदनामी करू अशी धमकी दिली.
या प्रकरणी अकोले पोलिसांनी अतुल गायकवाड यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गौतम दगडू कदम व अन्य अनोळखी तिघेजण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.