अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-साई मंदिर परिसरात भाविकांचे बाईट घेतले आणि गर्दी जमा केली म्हणून एक वृत्त वाहिनीच्या तीन पत्रकारांवर साई संस्थांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये पत्रकार नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी व व कॅमेरामन या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई संस्थानाचे उप कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना ही १६ नोव्हेंबर २०२० रोजी घडली असून तब्बल अडीच महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या मंदिरातील व्यवस्था व मनमानी कारभाराचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर संस्थांचे मुख्य अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सूड भावनेतून गुन्हा दाखल करून पत्रकारांचा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे.
बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. शिर्डीतील पत्रकारांवरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा यासाठी संगमनेरमधील पत्रकारांनी उप विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. याप्रकरणी पत्रकारांनी साई बाबा संस्थानाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे.