अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कर्जदारांना वेठीस धरुन खाजगी एजंटा मार्फत अवाजवी वसूली करर्णाया खाजगी फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
खाजगी फायनान्स कंपनीच्या सांगण्यावरुन टाळेबंदीत गाडी हिसकावण्यासाठी आलेल्या व मारहाण करर्णाया विरोधात फिर्यादी साहेबराव चांदणे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेबराव चांदणे यांनी २०१८ साली मालवाहू गाडी चौलामंडल फायनान्स सावेडी शाखा येथून कर्जाने घेतली होती. त्यांनी फेब्रुवारी २०२० पर्यंत नियमीत कर्जाचे हप्ते भरले.
दि.१६ मार्च रोजी सदरील मालवाहू गाडी वडगाव गुप्ता येथून शेंडी बायपासने औरंगाबाद रोडला जायला निघाली असताना वडगाव शिवारातून खारा ओढ्याजवळ मोटारसायकलवर तीन व्यक्ती ट्रिपल सीट आले.
त्यापैकी तानाजी झोंड (रा. सावेडी), संदीप दहातोंडे (रा. चांदा, ता. नेवासा) व इतर तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबवून गाडीतून बाहेर काढून काठीने मारहाण केल्याचे चांदणे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
मारहाण करणाऱ्या व्यक्ती व फायनान्स कंपनीवर कारवाई करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे व विशाल ढुमे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.