अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-बनावट वधूशी लग्न लावून देऊन मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ही आंतरराज्य टोळी असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील काल बुधवारी श्रीरामपूरच्या दौऱ्यावर आले असताना शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी या गुन्ह्याबाबत माहिती दिली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक आयुष नोपाणी उपस्थित होते. मालेगाव येथील एका विवाहित तरुणीची विक्री करण्यात आल्याप्रकरणी फिर्याद दाखल होती.
विवाहितेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हाही दाखल झाला होता. विवाहिता दत्तनगर येथे बहिणीकडे आली असता शेजारील एका महिलेने पत्नीला केटरिंगच्या कामासाठी नेले,
तेथून ती घरी परतली नाही, असे फिर्यादीत म्हटले होते; मात्र प्रकरण वेगळेच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यादृष्टीने या गुन्ह्याचा तपास करण्यात आला.
या तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला. त्यात श्रीरामपूर येथील चार तरुणांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले; मात्र प्रतिष्ठेला तडा जाईल, या भीतीने कोणीही पुढे आले नाही, असे पाटील यांनी सांगितले.