काळ्या बाजारात विक्रीसाठी चालवलेले रेशनचे धान्य नागरिकांनी पकडले! दोघांवर गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-शासकीय स्वस्त धान्य घेवून काळया बाजारात विक्रीसाठी जात असतांना नागरीकांनीच तो टेम्पो पकडला.

ही घटना शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. धान्य घेऊन थांबलेला टेम्पो नागरीकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला.

प्रभारी पुरवठा निरीक्षक संदीप मधुकर चिंतामण यांनी पंचनामा करून टेम्पो ताब्यात घेतला असून,चिंतामण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात प्रल्हाद दिनकर पवार (वय-३८ रा. नवगण राजुरी ता.जि.बीड ) व प्रदिप काळे (वय-३५ रा. वडुले बुद्रुक ता. शेवगाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या केसभट वस्तीवरील पटांगणातून टेम्पो (क्र. एम.एच१६ए.ई ३३४५) हा ६० गोण्या तांदूळ व १०० गोण्या गहू असे ८० क्विंटल शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून निघाला होता.

मात्र हा टेम्पो अमरापूर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ येवून थांबला. यावेळी काही नागरीकांना संशय आल्याने टेम्पोमध्ये पाहीले असता गहू व तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. चालकाकडे त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला.

नागरीकांनी याबाबत तहसिल कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर तेथे नायब तहसिलदार व्ही.के.जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक चिंतामण घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी चौकशी केली असता शासकीय गहू व तांदूळ विनापरवाना वाहतुक करत असल्याचे लक्षात आले. चिंतामण यांनी या धान्यचा पंचनामा केला. तसेच हा टेम्पो पोलीस ठाण्यात जमा करुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24