Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने नगर शहरात ‘मेरे घर आए राम’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी आम्ही एक व्हाॅट्सअप क्रमांक देणार आहोत.
या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून पाठवायची आहे. या सर्वांचे अवलोकन करून यातील प्रत्येक प्रभागातून तीन क्रमांक काढले जाणार आहेत.
स्पर्धा जिंकणाऱ्यांच्या घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना विखे कुटुंब स्वखर्चाने विमानाने अयोध्येला घेऊन जावून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या दर्शनाला घेऊन जाणार आहेत असे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
प्रभाग क्र.९ मध्ये अॅड. धनंजय जाधव यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा तसेच साखर व डाळ वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अॅड.धनंजय जाधव,
माजी उपमहापौर मालन ढोणे, सचिन पारखी, कालिंदी केसकर, संजय ढोणे, ज्ञानेश्वर काळे, सतीश शिंदे, ऋग्वेद गंधे, पंडित वाघमारे, विनोद बोगा, पियूष जग्गी आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड.धनंजय जाधव यांनी सांगितले की, अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणारा श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा पक्ष व जाती धर्म विरहित असून खा. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होणार आहे.
धार्मिकतेबरोबरच विकासाच्या योजना यशस्वी राबवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. सुजय विखे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे ते म्हणाले.