अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने, गावामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे झाले आहेत.
त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. हा कचरा अनेक दिवसांपासून साठल्यामुळे परीसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे टाकळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी केवळ एकच वाहन उपलब्ध आहे, ते देखील अनेकदा नादुरुस्त असते. ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी वाहने घेणे गरजेचे आहे.
तसेच वार्डरचनेनुसार स्वच्छता कर्मचारी ठेवले तर ही कचऱ्याची समस्या कमी करता येईल. गावातील मांस विक्री करणारे विक्रेते शिल्लक घाण बायपास जवळील पुलालगत टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे.
नागरिकांना त्या परीसरातुन पायी जाणे असाह्य झाले आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी वेळेवर कचरा गोळा करण्यासाठी वाहन येत नसल्याने नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला नेऊन टाकत आहेत.
ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी यांनी लक्ष देऊन कचरा समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.