अलीकडील काही काळात विविध पतसंस्था, मल्टीस्टेट मध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे प्रकार उघडकीस आले. ही फसवणूक होण्याची मालिका अद्यापही सुरूच आहे.
आता आणखी एका पतसंस्थेतील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. आनंद नागरी सहकारी पतसंस्थेमधील हा गैरकारभार आहे. शिरूर शहरातील नामांकीत पतसंस्था म्हणून हिला ओळखले जायचे. या पतसंस्थेमधील संचालक मंडळ व लेखा परीक्षकांनी संगनमताने तब्बल १७ कोटी रुपयांचा
अपहार करून ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यामध्ये पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदार पैसे ठेव म्हणून ठेवत असताना पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार चोरडिया यांच्यासह संचालक मंडळाने पतसंस्थेतील तब्बल १६ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये कर्ज आपल्याच नात्यातील लोकांना विनातारण वाटप केले आहे.
त्यानंतर सदर कर्जाची वसुली न करता बँकेचा तोटा असल्याचे दाखवले. दरम्यान पतसंस्थेचे तत्कालीन लेखा परीक्षक यांना याबाबतची सर्व माहिती असताना देखील वरिष्ठ कार्यालयांना कळवल्या नाहीत. संचालक मंडळाला साथ देऊन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात सहकारी संस्था पुणे व द्वितीय अप्पर विशेष लेखा परीक्षक संजयकुमार सखाराम मुंडे (वय ५६, रा. लेअर टाऊन अमेनोरा मागे हडपसर पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार पोपटलाल चोरडीया, संचालक प्रवीण चंपालाल चोरडीया, सनी धरमचंद चौरडीया, सविता अभयकुमार चोरडीया,
सुजाता नितीन चोरडीया, प्रीतम प्रवीण चोरडीया, पारसबाई पोपटलाल चोरडीया, चंपालाल बुधमल चोरडीया, सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडीया (सर्व रा. आनंद सोसायटी शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे), मुरसलीन वाहिद मोहम्मद (रा. सफरपूर राजपुतान ता. रूड जि. हरिद्वार राज्य उत्तराखंड) आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे
व्यवस्थापक शांताराम गंगाधर देवकर (रा. तीनचारी वस्ती कोल्हार बुद्रुक ता. राहाता जि. अहमदनगर), सनदी लेखा परीक्षक सरिता ब्रिजमोहन सिंह (रा. व्सिहाल रेसिडेन्सी कासारवाडी पुणे), नागेंद्र एच सोरटे, अजय एच सोरटे (दोघे रा. दापोडी पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करताहेत.