अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. नुकतेच शासनातर्फे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली.
त्यानुसार मास्कऐवजी तोंड रुमालाने झाकल्यास तो मास्क म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तोंडावर मास्क न लावणारे, मास्कऐवजी रुमाल वापरणारे व्यक्तींवर ५०० रूपये दंड आकाराला जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत काढलेल्या आदेशात करोनाच्या नवीन व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाची सक्ती केली आहे. तसेच विविध सेवा देणारे, दुकानांचे मालक,
परवानाधारक यांच्यासह ग्राहक अभ्यागत, सेवा घेणारे यांनी करोना नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यात पूर्वीप्रमाणे काही निर्बंध वाढवले आहेत. यात लग्नसमारंभ, कार्यक्रमातील उपस्थिती पुन्हा 50 टक्क्यांवर आणली आहे.
खुल्या जागेतील कार्यक्रमात क्षमतेच्या 25 टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. तसेच लसींचे दोन्ही डोसची सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक वाहतुकीसाठी संपूर्ण लसीकरणाची अट टाकली आहे. यासह जिल्हाधिकार्यांच्या आदेशात कोविड अनुरूप वर्तन न केल्यास दंडाची माहिती दिलेली आहे.
यात नियम मोडणार्या व्यक्तीला 500 रुपये दंड, तसेच संबंधीत व्यक्तीसह संबंधीत आस्थापनेला 10 हजार रुपयांचा दंड, त्यावर सुधारणा न झाल्यास संबंधीत संस्था आस्थापना बंद करण्यात येणार आहे.
तसेच वेळप्रसंगी हा दंड 50 हजारांपर्यंतही वाढविण्यात येणार असून टॅक्सी आणि खासगी वाहनातून प्रवास करणार्यांनी नियम मोडल्यास त्यांना 500 रुपये तर मालकाला, एजन्सीला 10 हजार रुपयांचा दंड करण्याचा देण्यात आलेला आहे.