टाकळीभान नागरीकांनी पावसाळ्यातील झिका या डेंग्युसदृश आजारापासून सावधानता बाळगावी व त्याची लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन माळवाडगाव व टाकळीभान येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश लोंढे व डॉ. राम बोरुडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पावसाळ्यात झिका आजार हा विषाणूजन्य आजार असून एडीस डासाच्या मार्फत त्याचा फैलाव होतो. या आजाराची लक्षणे सर्वसाधारण डेंग्यू आजारासारखीच असतात. यामध्ये ताप येणे, अंगावर लाल पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे आढळतात.
ही लक्षणे सौम्य प्रकारचे असतात. त्यामुळे शक्यतो रुग्णालयात जाण्याची गरज भासत नाही. परंतु पाच-सहा दिवसाच्या पुढे निरंतर ही लक्षणे सुरू असतील, तर नागरीकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एडीस डासांमार्फत डेंग्यू, चिकन गुण्या, पिवळा ताप हे सुद्धा आजार पसरतात. त्यामुळे याला वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने ज्या रुग्णांना ताप, अंगदुखी व इतर लक्षणे आहे. त्यांना वेळीच डॉक्टरकडे दाखवावे.
तसेच या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी डास फवारणी, आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी माहिती माळवाडगाव व टाकळीभान आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेश लोंढे व डॉ. राम बोरुडे यांनी दिली.