अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : प्रत्येक नगरकराने स्थानिक दुकानातच खरेदी केल्यास शहराच्या अर्थकारणाला बळकटी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कोणत्याही शहराच्या अर्थकारणात स्थानिक व्यापार, व्यवसाय महत्वाची भूमिका बजावतात. विश्वासार्ह खरेदीची हमी स्थानिक दुकानात मिळते. नगर शहराला बाजारपेठेचे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.

आता दसरा दिवाळी सारखे मोठे सण साजरे करताना ग्राहकांनी आपली खरेदी आपल्याच शहरात करून स्थानिक अर्थकारणाला बळकटी देणे गरजेचे आहे. यासाठी सुरू करण्यात आलेली लोक चळवळ कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

‘आपली खरेदी आपल्या नगरमध्ये’ या लोक चळवळीचे उद्घाटन महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. संग्रामभैय्या जगताप, आ. मोनिकाताई राजळे, अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर रोहिणी शेंडगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, युवा नेते अक्षय कर्डिले, आदेश चंगेडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. जगताप म्हणाले, नगर शहरावर प्रेम करणाऱ्यांनी एकत्र येत एक अत्यंत महत्वाची चळवळ सुरू केली आहे. आजकाल ऑनलाईन खरेदीचे किंवा मोठ्या शहरात जाऊन खरेदीचे प्रस्थ वाढले आहे.

यामुळे स्थानिक व्यापारावर परिणाम होतो. वास्तविक आज नगर शहरात सर्व नामांकित ब्रॅण्ड, दर्जेदार साहित्य उपलब्ध आहेत. कापड बाजार तर संपूर्ण राज्यात नावाजला जातो. अशा वेळी प्रत्येक नगरकराने स्थानिक दुकानातच खरेदी केल्यास शहराच्या अर्थकारणाला बळकटी येईल, असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office