वीज जोडणीसाठी पोलवर चढला आणि व्यवसायिकाने फ्युज टाकला ! विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : वीज वाहक पोलवर विजेच्या तारेची जोडणी करत असताना गिरणी व्यवसायिकाने पूर्व कल्पना असताना देखील डीपी वरील फ्युज टाकला. त्यामुळे राहाता तालुक्यातील वाकडी येथील बाबासाहेब माधव लहारे (वय ५१) यांचा विजेच्या जबर धक्क्याने नुकताच मृत्यू झाला.

याप्रकरणी विकास बाबासाहेब लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक शेळके, अशोक कोते यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. १०) सकाळी माझे वडील बाबासाहेब लहारे हे घरी असताना अशोक शंकर शेळके घरी आले व घराची वायर जोडायची असे सांगून वडिलांना घेऊन गेले.

ज्या ठिकाणी काम करायचे होते, त्या डीपीचा विद्युत प्रवाह माझ्या वडिलांनी बंद करून फ्युज तार सोबत घेऊन गेले होते. हा विद्युत प्रवाह बंद केल्यावर याच भागातील गिरणी व्यावसायिक अशोक नारायण कोते यांना हे काम होईपर्यंत विद्युत प्रवाह बंद केल्याची कल्पना दिली होती.

आपण डेअरीला दूध घालून गावातून घरी चाललो असता अशोक शेळके यांनी मला आवाज देत सांगितले की, तुझे वडील शॉक लागून खाली पडले आहे. त्यामुळे मी तात्काळ डीपीकडे निघालो असता, अशोक कोते हे डीपी लगत दिसले. त्यावेळी त्यांना विचारणा केली.

तर त्यांनी डीपीच्या फ्युज टाकल्याचे सांगितले. आपण तात्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून वडिलांना श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्टिपल मध्ये उपचारासाठी घेऊन गेलो, तेव्हा डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून माझ्या वडिलांना मृत असल्याचे घोषित केले.

त्यामुळे अशोक शंकर शेळके यांनी माझ्या वडिलांच्या सुरक्षेची काळजी न घेता विजेच्या खांबावर वायर ओढण्याचे काम करण्यास सांगितले. तसेच अशोक नारायण कोते यांनी सदरील काम पूर्ण झाले की नाही, याची खात्री न करता डीपी वरील फ्युज टाकल्यामुळे माझे वडील बाबासाहेब माधव लहारे यांचा मृत्यू झाला आहे. म्हणून माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अशोक शंकर शेळके व अशोक नारायण कोते यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे.

दरम्यान, श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अशोक शेळके व अशोक कोते यांच्यावर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अशोक शेळके यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने पुढील तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अशोक कोते याला देखील अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन शिंदे करीत आहे. मयत बाबासाहेब लहारे हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe