उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.त्यामुळे तेथे भूस्खलन होऊन अनेक पूल आणि रस्ते वाहून गेले असल्याचे सांगितले जात आहे. बुधवार (दि. ३१) रोजी रात्री उशिरा केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती अजूनच बिघडली.
त्यामुळे अनेक भाविक गुप्त काशीजवळ नारायणकोट येथे अडकले. या भाविकांच्यात कोपरगावातील ५३ भाविक देखील असल्याचे वृत्त आले आणि सगळ्याना चिंता लागली. दरम्यान, शुक्रवारी त्यातील विवेक जोशी यांच्याशी संपर्क झाला असता सर्वच यात्रेकरू सुखरुप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी सर्व यात्रेकरूंची विचारपूस करून पुढील यात्रेस शुभेच्छा दिल्या. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर ढगफुटी झाल्याने मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली. यामुळे रस्ते उद्ध्वस्त झाल्याने यात्रा विस्कळीत झाली.
अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने कोपरगावातील ५३ यात्रेकरू अडकले होते. त्यांना स्थानिक प्रशासनाने नारायणकोटा येथे लॉजवर राहण्याची व्यवस्था केली. त्यांनी दोन दिवस केदारनाथ दर्शनाला जाण्याची प्रतीक्षा केली.
मात्र केदारनाथ परिसरात पाऊस होत असून केदारनाथ परिसराला जोडणारे रस्ते खचले आहेत. पायी यात्रेकरूंची वाट वाहून गेल्याने कोपरगावातील यात्रेकरू सुखरूप माघारी निघत बद्रीनाथ दर्शनाला निघाले. सध्या उत्तराखंड प्रशासनाने शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले.
स्थानिक प्रशासनासह आपत्कालीन पथकांना विविध ठिकाणी मदत पोहोचवली. केदारनाथला जाताना रस्त्यातच चहा प्यायला थांबलो असता सात किलोमीटरवर ढगफुटी झाली. अनेक नागरिक वाहून गेले आहेत. त्यामुळे केदारनाथला न जाता बद्रीनाथ दर्शनाला निघालो, असे विकी जोशी यांनी सांगितले.