जामखेड तालुक्यातील मोहरी, खर्डासहित जामखेड शहरात ८ जुलै रोजी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने छोट्या बंधाऱ्यासहित मोहरी तलाव हा केवळ दोन तासात भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्याचा प्रकार २५ वर्षात पहिल्यांदाच घडला असल्याचे जुने जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
मोहरी येथील काही शेतकऱ्यांचे मात्र या तुफान मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद पीक हे पाण्यात वाया गेले आहेत तसेच काही ठिकाणी कडब्याच्या गंजी देखील वाहून गेल्या असून राहती घरे पडली आहेत.
काहींच्या शेतीतील माती वाहून गेली असून या सर्व नुकसानीची तहसीलदार गणेश माळी यांनी स्वतः पाहणी केली व सर्कल, तलाठी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. झालेल्या नुकसानीची लवकर भरपाई मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
याबाबत शासनाला अहवाल पाठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी सांगितले. गेली अनेक वर्षांतला या ढगफुटी सदृश्य पावसाने मात्र खर्डा व परिसरातील छोटे छोटे बंधारे तलाव तसेच मोहरी तलाव सुद्धा पूर्ण भरून त्याचे सांडव्यातून पाणी पुढे खैरी मध्यम प्रकल्पाकडे झेपावले असल्यामुळे पुढील काळात राहिलेल्या पावसाळ्यात खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी मशागती करून वेळीच पेरणी केली असल्यामुळे उडीद, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांची उगवण क्षमता चांगली आली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्यातरी आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी मंडल अधिकारी नवले, तलाठी कुलकर्णी, गोडगे, कृषी अधिकारी दस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष रामहरी गोपाळघरे, बाळासाहेब सानप, सरपंच हनुमंत हजारे, बबन गोपाळघरे आदींसह मोहरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.