Ahmednagar News : पारनेर नगर मतदार संघातील विविध गावांमध्ये गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे आमदार नीलेश लंके यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्याकडे लक्ष वेधले.
अतिवृष्टीने बाधित वनकुटे गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. हे गावही भरपाईपासून वंचित असल्याचे आ. लंके यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर लवकरात लवकर भरपाई देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. लंके यांना दिली.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, एप्रिल महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पारनेर- नगर मतदार संघाच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून घरांवरील पत्रेही वाऱ्यामुळे उडून गेले आहेत.
शासकिय योजनेमधून बांधण्यात आलेल्या घरकुलांचेही नुकसान झाले आहे. दि. ११ एप्रिल रोजी मतदार संघातील अतिवृष्टीबाधीत वनकुटे गावाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. ग्रामस्थ तसेच बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधताना घाबरून नका, आठ दिवसांत पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
मात्र चार महिन्यांचा कालावधी उलटूनही या अतिवृष्टीने संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना अद्यापही शासनाकडून एक रूपयाही मदत न मिळाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या मनात शासनाविषयी तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली असल्याचे नमुद केले आहे. यावेळी आ. लके यांच्या समवेत वनकुट्याचे माजी सरपंच अॅड. राहुल झावरे हे उपस्थित होते.