अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना शाश्वत व संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
त्यादृष्टीने राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यात येत आहे.
यात नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि कोपरगावचा समावेश आहे. याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांच्या आत्महत्याप्रवण 14 जिल्हे, 3 नक्षलग्रस्त जिल्हे अशा 17 जिल्ह्यातील सर्व तालुके, तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा एकूण 244 तालुक्यामध्ये हि योजना राबविण्यात येत होती.
तर आता या योजनेमध्ये राज्यातील उर्वरित सर्व 106 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेतकर्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी
प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेमध्ये देय असलेल्या अनुदानाशिवाय अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांसाठी 25 टक्के व इतर शेतकर्यांसाठी 30 टक्के पुरक अनुदान राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदान देण्यात येते.
राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्पभुधारक शेतकर्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी 80 टक्के अनुदान तर इतर शेतकर्यांना 75 टक्के अनुदान देय राहणार आहे.