जामखेड शहरातील बीड रोडवर, नवले पेट्रोल पंपाच्या जवळ, इर्टीगा कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि नंतर कारने पेट घेतला. सीएनजी गॅसच्या स्फोटामुळे वाहनाने आगीच्या ज्वाळा पकडल्या. या दुर्घटनेत कारमधील दोन जण होरपळून मृत्यूमुखी पडले. ही दुर्दैवी घटना २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल एक तास प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.

या दुर्घटनेत जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी गुडवाल आणि जामखेडमधील साईनाथ पॉन शॉपचे व्यापारी महादेव काळे यांचा समावेश असल्याचे समजते.
कारचा जोरदार अपघात झाल्याने टायर १००-१५० फूट दूर फेकला गेला. इर्टीगा गाडीची अत्याधुनिक रचना असल्याने ती लॉक झाली आणि त्यामुळे कारमधील व्यक्तींना बाहेर पडणे शक्य झाले नाही.
या भयंकर आगीत दोघेही पूर्णतः होरपळल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या दुर्घटनेबाबत जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.