अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील जालिंदर विटनोर हे पुणे येथे महाविद्यालयाच्या कामासाठी गेले असता त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या गेटमध्ये नऊ कोटी रुपयांचा चेक सापडला तो त्यांनी प्रामाणिकपणे बँकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. विटनोर हे बुधवारी महाविद्यालयाच्या कामानिमित्त पुणे येथे परीक्षा मंडळात गेले होते. काम संपून सायंकाळी पाच वाजता बेलापूरला येण्यासाठी बसस्थानकाकडे येत असताना मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रचा नऊ कोटी रुपयांचा धनादेश सापडला.
त्यांनी तत्काळ शिवाजीनगर येथील मुख्य मुख्य शाखेत जाऊन बँक ऑफ महाराष्ट्राचे महाप्रबंधक कुलकर्णी व पारख यांच्याकडे सुपूर्द केला. सदर धनादेश हा महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी निवृत्तीवेतन फंडाचा होता. महाराष्ट्र बँकेला हा चेक एलआयसी कडे सुपूर्द करावयाचा होता.
एलआयसी मुख्य शाखाही शिवाजीनगरला असल्याने तेथे जमा करण्यासाठी जात असताना कर्मचाऱ्याकडून पडला असावा. प्रा. विटनोर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतूक करून त्यांचा बँक अधिकाऱ्यांनी सत्कार केला.