अहमदनगर बातम्या

खरीप हंगाम २०२४ साठी आ. काळे भरणार शेतकऱ्यांचे पिक विम्याचे अर्ज !

Published by
Ahmednagarlive24 Office

खरीप हंगाम २०२४ साठी पिकविमा भरण्याची सुरुवात १८ जून पासून सुरु झाली आहे. मागील वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी पिक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता. यंदाही शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे पिकविम्याचे अर्ज आ. आशुतोष काळे भरणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे की, दुष्काळ, अतिवृष्टी, आदी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने पिकविमा योजना राबविली जात आहे.

पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व किंवा लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकविमा योजनेच्या माध्यमातून विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देते.

मागील वर्षी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी यासाठी आ. काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम मिळाली, असून उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु असून हि रक्कम देखील लवकरच मिळणार आहे.

यावर्षी देखील कोपरगाव मतदारसंघात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसले तरी येत्या काळात पावसाची सरासरी भरून निघणार असली तरी कमी पर्जन्यमान किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी पिकविमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून येण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.

या दृष्टीकोनातून आ. काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जवळपास ७१ हजार शेतकऱ्यांच्या खात्याचे सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, भुईमूग, खरीप कांदा आदी खरीप पिकांच्या विम्याचे अर्ज भरून पिकविमा रक्कम देखील आपल्या पगारातून विमा कंपनीला अदा करणार आहे

त्यामुळे यदाकदाचित दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विमा कंपनीकडून नुकसान झालेल्या सर्वच खरीप पिकांची नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज भरण्यासाठी बुधवार (दि.१०) पासून जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन आ. काळे यांनी केले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Ahmednagarlive24 Office