मोहरम मिरवणुकीत आ. संग्राम जगताप यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी केली ‘ती’ घोषणाबाजी ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगरमध्ये मोहरम निमित्त कत्तलची रात्र मिरवणुकीच्या वेळी बारा इमाम कोठला परिसरात गेलेल्या आ. संग्राम जगताप यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी खा. निलेश लंके यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा व्हिडीओ शहरात व्हायरल झाला आहे.

नगरमध्ये मोहरमनिमित्त कत्तलची रात्र मिरवणूक मंगळवारी (दि.१६) रात्री काढण्यात आली होती. ही मिरवणूक सुरु होण्याअगोदर सवाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी मंगलगेट हवेली, कोठला परिसरात मोठी गर्दी झाली होती. आ. संग्राम जगताप हेही पदाधिकाऱ्यांसह तेथे गेले होते.

त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. त्याचवेळी आ. जगताप यांच्यासमोर अनेक कार्यकर्त्यांनी लंके, लंके अशी घोषणाबाजी सुरु केली. काहींनी या घोषणाबाजीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ शहरात सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा होत आहे.

आ. जगताप व खा. लंके हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात एकत्र होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश करत निवडणूक लढविली. तर आ. जगताप महायुतीत असल्याने त्यांनी भाजपाचे डॉ. सुजय विखे यांचा प्रचार केला होता.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली आ. जगताप यांच्यासमोर खा. लंके यांच्या नावाची झालेली ही घोषणाबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.

शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मोहरममधील हसन व हुसेन यांच्या सवारीची ‘कत्तलची रात्र’ व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. या दोन्ही मिरवणुका रेंगाळल्या. कत्तलची रात्र मिरवणूक मंगळवारी रात्री बारा वाजता सुरू झाली.

बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सवारी कोठल्यात पोहचली. त्यानंतर दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू झाली. रात्री पावणे नऊनंतर सवारी दिल्लीगेट वेशीबाहेर पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.

दरम्यान, कत्तलची रात्र मिरवणुकीपूर्वी रात्री खासदार नीलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांनी सवार्‍यांचे दर्शन घेतले. दोघेही एकाच वेळी कोठल्यात पोहचल्याने पोलीस दक्ष झाले होते. यावेळी लंके समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office