Ahmednagar News : आमदार ही काही वेगळी पदवी नाही. शेवटी तो त्या कुटूंबाचा कुटूंबप्रमुख म्हणून ती जबाबदारी देण्यात आलेली असते. कुटूंबातील वेगवेगळ्या अडचणी समजुन घेऊन त्या कशा सोडविल्या जातील याचा प्रयत्न केला पाहिजे. या भावनेतून मी काम करतो. असे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
जिल्हा सामान्य रूग्णालय, नीलेश लंके प्रतिष्ठाणचा दिव्यांग सेल, पारनेर नगरपंचायत व पारनेर ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ग्रामीण रूग्णालयात अपंग बांधवांची तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आ. नीलेश लंके यांच्या हस्ते या शिबिचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आ. लंके म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून आपण हा उपक्रम राबवित आहोत. गेल्या वर्षी दिव्यांग बांधवांना या कॅम्पचा चांगला फायदा झाला.
नगरला जाऊन या कामासाठी दिवसभर थांबायचे, थांबूनही प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असे. गेल्या वर्षी २ हजार ८०० रूग्णांना या कॅम्पचा फायदा झाला. त्याचे श्रेय सुनील करंजुले व त्यांच्या संपुर्ण टिमला जात असल्याचे लंके यांनी सांगितले.
यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि जिल्हा रुग्णालय पारनेर यांच्यासह जिल्हा रूग्णालयातील विविध विभागांचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते.