बाळ बोठे हाजिर हो ! जामीन मिळविण्यासाठी बोठेला करावे लागेल असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ बोठे पसार आहे.

बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे ३ डिसेंबरला समोर आले होते. तेव्हापासून तो पसार झाला आहे. बोठे याचा पोलीस शोध घेत असतानाच त्याने ७ डिसेंबरला न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मात्र या सुनावणीच्या वेळेस बोठे याला स्वतः न्यायालयात हजर राहण्यास सांगावे, असा अर्ज पोलिसांनी सरकारी वकिलांच्या मार्फत न्यायालयात दिला आहे. अटकपूर्व जामिनासाठी बोठे याने अ‍ॅड. महेश तवले यांच्या माध्यमातून ७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.

यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. त्यावर अभ्यास करण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे. तसेच आरोपीच्या वकिलांकडूनही मुदत वाढवून मागण्यात आली आहे. दरम्यान रेखा जरे यांच्या मुलाने आरोपी बोठे याच्यापासून जरे कुटुबीयांना धोका असल्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानंतर जरे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देखील देण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24