आ. काळेंचा मतदारसंघातील विकासकामांशी कवडीचाही संबध नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या निधीतून राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५२ जीचे कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून त्यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे,

हे सर्वश्रुत असताना केवळ येऊ नको म्हणे कोणत्या गाडीत बसू, अशी गत असलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी भाजपच्या मंत्री महोदयांनी त्यांच्या शब्दाला किंमत दिल्याचा बेगडी कांगावा करणे हे हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी सुधाकर रोहोम यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना केली. ते म्हणाले की,

नगर-मनमाड हा जीवघेणा महामार्ग अशी ख्याती मिळाली असलेला महामार्ग दुरुस्ती करण्यास राज्य सरकार कोणत्याही बाजूने सक्षम नसल्याचे सिद्ध होत होते.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघाडी सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यांची मानसिकता नव्हती. पर्यायाने हा महामार्ग केंद्राकडे वर्ग करून निदान नागरिकांना होणाऱ्या या अथक जाचातून मुक्त करावे, अशी विनवणी नितीन गडकरी यांच्याकडे माजी आमदार कोल्हे यांनी केली होती.

त्याच पार्श्वभूमीवर २०२१ ला केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अहमदनगर दौऱ्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला होता. तशी निधीबद्दल घोषणा देखील केली होती. भाजप पदाधिकारी यांच्या शब्दाला केंद्रीय मंत्री प्रतिसाद देतात हे अनेकदा सिद्ध झालेले असताना जे स्वतः राष्ट्रवादीमध्ये आहेत,

त्यांनी भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी उडी घेणे म्हणजे येऊ नको म्हणे कोणत्या गाडीत बसू, अशी गत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली.

आमदार काळे जेव्हा सत्ता स्थापन झाली तेव्हापासून गेल्या दोन वर्षांत तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी शब्द सोडून कवडीचा निधी स्वकर्तृत्वाने काळे यांनी आणलेला नाही,

याचा विसर सुधाकर रोहोम यांना पडला असावा. त्यामुळेच कोल्हे कुटुंबावर टीका करण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. कोपरगाव शहरात नगरसेवकांच्या हक्काच्या निधीच्या कामांच आयते नारळ फोडणे,

कोल्हे यांच्या काळातील विकासकामांवर आयत्या कोनशिला लावणे व उद्घाटने करणे अशी बाळबोध धडपड विरोधक करत असून स्वतःच्या निधीतून मंजूर असून पूर्ण केलेले एकही काम काळे यांना आजवर करता आले नाही,

यातच कोणाचा कशाशी कवडीचाही संबंध नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे, याबाबत आमदार काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमदार काळे यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवर हक्क दाखवण्यापेक्षा कोपरगाव मतदारसंघाचा शेजारील नाशिक,

औरंगाबाद जिल्हा सीमा जोडणारे रस्ते राज्य सरकारकडून करून घेण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी दुसऱ्यांच्या कामाबाबत नाक खुपसू नये, प्रत्यक्षात काम मंजूर करून त्यासाठी निधी मिळवा,

मात्र तसे न करता एकाच निधीचे पन्नास तुकडे करून दीडशे वेळा जाहिरातबाजी करून घेत जनतेला फसवण्याचा विचार आमदार काळे करत होते.