अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-चालू वर्षी पावसाने सर्वत्र कहर केला. अनेक ठिकाणी सरासरी ओलांडली. त्यामुळे हजारो हेकटरवरील पिके भुईसपाट झाली. या नुकसानीमुळे शेतकरी खूपच संकटात खचला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने राज्यातील सर्वच विभागात थैमान घातल्याने शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
हातातोंडाशी आलेली पिके आणि रब्बीची सुरू असलेली पेरणी निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला असून दुहेरी अर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकर्यांवर आली असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात सातत्याने सुरु असलेल्या
पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून, शेतकऱ्यांना मदत मिळवी म्हणून नुकसान भरपाईच्या निकषात बदल करावेत आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.
यावर्षी मान्सून वेळेवर सुरु झाल्याने कोवीडचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. बाजरी, सोयाबीन, कडधान्ये, मका, कांदा इत्यादी पिकांची करण्यात आलेली पेरणी चांगल्या पध्दतीने होवून पिकही काढणीसाठी आलेली होती.
मात्र सततच्या पावसामुळे हाताशी आलेली पिक जमिनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यापुर्वी बोगस बियाणांमुळे झालेली फसवणूक, शेतकऱ्यांवर आलेले दुबार पेरणीचे संकट आणि आता नैसर्गिक आपत्ती, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.
खरीप हंगामातील संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता रब्बीची पेरणीही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने आता पंचनाम्याची वाट पाहता सरसकट मदत जाहीर करून दुबार पेरणीसाठी शेतकर्यांंना सहकार्य करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved