महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक विकासकामांत स्थगितीचे राजकारण झाले. महायुतीने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्दबातल ठरवले. परंतु यात एक अहमदनगर जिल्ह्यात कर्ज एमआयडी बाबतचा प्रश्न भिजत पडला. आ. रोहित पवारांनी पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलने करत एमआयडीसी मंजूर करून घेण्यापर्यंत धाव घेतली. त्यात अचानक आ. राम शिंदे यांची एंट्री झाली.
त्यानंतर मात्र कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या वसाहतीचा प्रश्न वेगळ्या वळणावर आला. या एमआयडीसीसाठी जी जागा प्रस्तावित होती ती रद्द करून आता ती नव्या ठिकाणी नेली जाणार आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार पवार यांना हा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. आता आ. पवारही आक्रमक झाले असून त्यांनी शिंदेंसह सरकारवरही जोरदार टीका केलीये.
नेमके काय घडले
ज्या जागेत ही एमआयडीसी होत आहे त्याला स्थानिक पातळीवर विरोध असून त्यातील काही जागा नीरव मोदीच्या मालकीची आहे व त्यामुळे स्थानिकांचा विरोध होत आहे असे आ.शिंदे यांनी दाखवून दिले. यावर मंगळवारी नागपूरमध्ये उद्योगंत्री उदय सामंत, आमदार राम शिंदे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन यात प्रस्तावित जागेला पाटेगाव ग्रामपंचायतीचा विरोध असल्यावर सर्वांचे एकमत झाले.
या बैठकीस मात्र आ. पवारांना बोलवले नाही. देशाला फसवलेल्या भगोडा नीरव मोदीची जमीन प्रस्तावित एमआयडीसीत असल्यामुळे हा प्रस्ताव रद्द करून पंधरा दिवसांत नवीन जागा शोधून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा आदेश या बैठकीत दिला गेला.
आ. रोहित पवारांची मोठी टीका
एमआयएडीसी बाबत झालेला हा निर्णय समजताच आमदार पवार आक्रमक झाले. ते म्हणाले, मागील आधिवेशनापासून याला मंजुरी मिळण्यासाठी मी झगडत असून केवळ राजकीय कारणातून आमदार राम शिंदे यांनी एमआयडीसीला विरोध केला.
आ. राम शिंदेंनी त्यांचा आजवरच्या काळात मतदारसंघात साधे उसाचे गुऱ्हाळ तरी उभारले आहे का असा खडा सवाल करत एमआयडीसीमधून वीस हजार जणांना रोजगार मिळू शकतो पण मुळात शिंदे यांना यातील काही कळते का? असा खडा सवाल केला. तसेच ज्यांना यातील काही कळत नाही त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे तालुक्याचे नुकसान होत असल्याची टीका त्यांनी केली.
महामार्गालगतची जागाच योग्य
आ. रोहित पवार म्हणाले की, दुसरीकडे शंभर दीडशे एकराची जागा देऊन काहीही साध्य होईल असे वाट नाही. महामार्गालगतची ही जागा सर्व दृष्टीने योग्य होती. येथे मोठे उद्योग यावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणला होता जेणे करून याचा फायदा भविष्यात होईल. तीच जागा यासाठी योग्य असल्याचे ते म्हणाले.