अहमदनगर बातम्या

आ. राम शिंदे यांनी पंधरा दिवसांत कर्जतमध्ये एमआयडीसी केल्यास त्यांच्या घरी जाऊन…

Published by
Ahmednagarlive24 Office

कर्जत तालुक्‍यात मंजूर होण्याच्या टप्प्यावर असलेली एमआयडीसी राजकीय आकसातून रद्द करून कर्जत -जामखेड तालुक्‍यातील जनतेचे अतोनात नुकसान करून येथील जनतेच्या जीवन मरणाशी खेळ करणाऱ्या सरकारचा, उद्योगमंत्री उदय सावंत यांचा व हे सर्व करायला लावणारे आ. राम शिंदे यांचा तीव्र शब्दांत निषेध करत कर्जत येथे रास्ता रोको करत प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.

आ. रोहित पवार यांनी जनतेच्या प्रश्‍नावर पायी संघर्षयात्रा काढून त्याचे निवेदन घेण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी तर आले नाहीतच शिवाय निवेदन देण्यासाठी जात असताना संघर्षयात्रेवर लाठीहल्ला करून आ. पवार व त्यांच्या सहकार्‍यांना अटक करण्यात आली.

या घटनेचा निषेध करत कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर कर्जत ‘शहर कडकडीत बंद होते. सकाळी दहा वा. राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते तसेच कार्यकर्ते कर्जत येथील छ. शिवाजी महाराज चौकात जमले.

त्यांनी जोरदार घोषणा बाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी अनेकांची भाषणे झाली. शेवटी आंदोलकांनी नायब तहसीलदार कारंडे यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

या वेळी पाटेगाव ग्रामपंचायतचा विरोध असल्याचे कारण देत एमआयडीसी रद्द करणे चुकीचे असून, याविरुद्ध आपण हायकोर्टात जाऊ, असा इशारा देताना एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रातून बागायती क्षेत्र रहिवास असलेले क्षेत्र वगळण्यात यावे,

अशी आमची मागणी असून, विरोध मात्र नाही व ग्रामपंचायतने तसा ठरावही केलेला नाही, असे म्हणत नीरव मोदींची जमिनीचाही याशी काही संबंध नाही, असे म्हणत एमआयडीसी याच ठिकाणी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी, शासनाने कर्जत शहराला फायदा होईल, अशा ठिकाणी होणारी एमआयडीसी रद्द करून पंधरा दिवसांत नव्याने ‘एमआयडीसीसाठी तालुक्‍यात जागा उपलब्ध करून देऊ, असे जाहीर केले असून,

आ. शिंदे यांनी पंधरा दिवसांत कर्जतमध्ये एमआयडीसी केल्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांचे बुट आपण पुसू, असे थेट आव्हान दिले. राजकारणासाठी जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रश्‍नात विघ्न आणून राजकारण करू नये, असे आवाहन करत आभार मानले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office