अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे.
मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा नवा अवतार नगर मध्ये आल्याने नगरकरांची चिंता वाढली होती, मात्र आता रिपोर्ट हाती असले असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
इंग्लंडमधून भारतात आलेल्या 25 प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. यात 19 व्यक्ती या मनपा हद्दीतील तर 6 ग्रामीण भागातील होत्या.
यापैकी 20 जणांचा करोना अहवाल शनिवारी निगेटिव्ह आला होता उर्वरित 5 अहवालापैकी आणखी 3 अहवाल निगेटिव्ह आल्या असून अद्याप दोन अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
इंग्लंडमधील काही भागात सध्या करोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात आले.