अहमदनगर बातम्या

2019 च्या तुलनेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राजळे यांच्या संपत्तीत घट तर संग्राम जगताप यांच्या संपत्तीत वाढ! वाचा कुणाची आहे किती संपत्ती?

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या माध्यमातून आता उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आले असून विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार अर्ज  भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे व त्यामुळे आता राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी कालपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे.

आपल्याला माहित आहे की विधानसभा निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक असो यामध्ये अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागते व या प्रतिज्ञापत्रामध्ये संपत्तीचे विवरण देणे बंधनकारक असते.

जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर काल अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले व यामध्ये प्रामुख्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप तसेच आमदार मोनिका राजळे, किरण लहामटे इत्यादी नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

व या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचे विवरण दाखल केले व त्यानुसार जर बघितले तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्थावर मालमत्तेत तब्बल एक कोटी 79 लाख रुपयांची घट झाल्याचे दिसून आले. परंतु त्यांच्या पत्नी शालिनी विखे यांची स्थावर संपत्ती मात्र 81 लाख 35 हजार रुपयांनी तर जंगम मालमत्तेत एक कोटी 84 लाखाने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

 कोणत्या नेत्याकडे आहे किती संपत्ती?

1- राधाकृष्ण विखे पाटील अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरील संपत्तीचे  विवरण पाहिले तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाचशे पन्नास ग्राम सोने तर त्यांच्या पत्नीकडे 1150 ग्रॅम सोने आहे.

तसेच त्यांच्या स्वतःकडे 11 कोटी 35 लाख 39 हजार 820 रुपयाची स्थावर मालमत्ता आहे तर 12 कोटी 74 लाख 82 हजार 160 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे दोन कोटी 99 लाख 45 हजार 610 रुपयांची स्थावर तर 6 कोटी 79 लाख 82 हजार पाचशे पाच रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

2- संग्राम जगताप स्वतः संग्राम जगताप यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता सात कोटी पन्नास लाख 61 हजार तीनशे दोन रुपयांची असून त्यांच्या पत्नीकडे एकूण स्थावर मालमत्ता दोन कोटी आठ लाख 98 हजार 110 रुपये इतकी आहे.

संग्राम जगताप यांच्या स्वतःकडे जर बघितली तर तीन कोटी दहा लाख 93 हजार 518 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे एक कोटी 58 लाख 49 हजार अठरा रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

2019 च्या तुलनेत संग्राम जगताप यांच्या एकूण स्थावर संपत्तीत 39 लाख 41 हजार 302 रुपयांची तर 88 लाख 56 हजार 702 रुपयांचे जंगम मालमत्तेत वाढ झाल्याचे दिसून आले.

तसेच त्यांच्या पत्नीच्या स्थावर मालमत्तेत एक कोटी 48 लाख 28 हजार 110 रुपयांची वाढ झाली तर जंगम मालमत्तेत एक कोटी बारा लाख 66 हजार 56 रुपयांची वाढ झालेली दिसून आली.

3- मोनिका राजळे मोनिका राजळे यांच्याकडे एक चार चाकी वाहन असून स्वतःकडे सातशे बेचाळीस ग्रॅम सोने आणि स्थावर मालमत्ता दोन कोटी 85 लाख 7 हजार दोनशे रुपये इतकी असून जंगम मालमत्ता दोन कोटी 50 लाख 84 हजार 718 रुपये इतकी आहे.

2019 च्या तुलनेत बघितले तर त्यांच्या स्थावर मालमत्तेत तब्बल एक कोटी साठ लाख 79 हजार 194 रुपयांची घट झाल्याचे दिसून आले व जंगम मालमत्तेत मात्र एक कोटी 84 लाख 66 हजार 920 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

3- राणी लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार राणी लंके यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. त्यांच्याकडे दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांचे 30 ग्रॅम सोने असून स्थावर मालमत्ता नाही.

परंतु दोन लाख 93 हजार 221 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. राणी लंके यांचे पती खासदार निलेश लंके यांच्याकडे कार, वीस ग्रॅम सोने तसेच 19 लाख 22 हजार दोनशे दहा रुपयांची स्थावर तर 26 लाख 59,403 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

4- शिवाजी कर्डिले माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची स्थावर मालमत्ता 2019 मध्ये सात कोटी छत्तीस लाख 35 हजार 878 रुपये होती. त्यामध्ये आता दुपटीने वाढ होताना दिसून येत असून 2024 मध्ये त्यांच्याकडे 15 कोटी 86 लाख 12 हजार 869 रुपये इतकी वाढ झाल्याचे दिसून आले तर त्यांच्याकडे चार चाकी वाहने तीन व सोने जवळपास 322.64 ग्रॅम आहे.

जंगम मालमत्ता बघितली तर ते 99 लाख 68 हजार 339 रुपये इतकी असून त्यांच्या पत्नीच्या नावे आठ कोटी 40 लाख 36 हजार 939 रुपयांची स्थावर तर जंगम मालमत्ता ही 45 लाख 45 हजार 362 रुपये इतकी आहे.

5- किरण लहामटे किरण लहामटे यांच्याकडे एक चार चाकी वाहन असून स्वतःकडे 20 ग्राम सोने व त्यांच्या पत्नीकडे 70 gm सोने आहे. स्वतः त्यांच्याकडे 55 लाख 50 हजार रुपयांची स्थावर तर 70 लाख 80 हजार 577 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

त्यांच्या पत्नीकडे 17 लाख 25 हजार 760 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. किरण लहामटे यांच्या संपत्तीतील 2019 च्या तुलनेत बघितले तर स्थावर मालमत्तेत 1.55 लाख रुपयांची तर जंगम मालमत्तेत 65 लाख 66 हजार 596 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil