अहमदनगर बातम्या

नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या : स्नेहलता कोल्हे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  कोपरगाव शहर व मतदार संघात सलग दोन दिवस गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाची वाट लागली आहे. शेतकरी धायमोकलून रडत आहे. असंख्य ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साठले.

घरांची पडझड होऊन संसारपयोगी साहित्याची हानी झाली तेव्हा शासनाने तत्काळ झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. गुलाब चक्रीवादळ निर्माण झाल्यांने त्याचा तडाखा कोपरगांव विधानसभा मतदार संघातील बहुतांश गावांना बसला,

सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस ११० मिलीमिटरच्यावर पाउस झाला. या -अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन, बाजरी, कापूस, लाल कांदा, फळबागा आदि काढणीला आलेल्या पिकांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांद्यासाठी रोपे टाकली त्याचेही अतोनात नुकसान झाले.

असंख्य शेतक-यांचा उस शेतातच आडवा झाला आहे. त्यामुळे येथील शेतकरी धायमोकलून रडत आहे. या अस्मानी संकटामुळे खरिपा बरोबरच, रब्बी पिक नियोजनावर निसर्गाने पूर्णपणे वरवंटा फिरवला. गेल्या दोन वर्षापासून अगोदरच शेतकरी व सर्वसामान्य कोरोनामुळे अडचणींत आहे.

आगास पिके आज पुर्णपणे पाण्यांत सडुन चालली आहे. अनेक ठिकाणी ओढया नाल्यांना पुर आले आहेत. सखल भागात पाणी साठले आहे.

कोपरगाव शहराच्या खडकी तसेच ग्रामिण भागातील ब्राम्हणगांव, येसगाव येथे अनेक घरांच्या पडझडी होऊन संसारपयोगी साहित्याची हानी झाली.

जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार विजय बोरुडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन हाताळणा-या अधिकारी वर्गाला नुकसानीची पुर्वसुचना देऊन मदतीचे आवाहन केले, असे कोल्हे यांनी म्हटले.

Ahmednagarlive24 Office