कृषी विधयेकाच्या समर्थनार्थ संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून कृषी विधेयकावरून देशातील अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान शेतकरी संघटनांनी या विधेयकाला विरोध दर्शवित देशभर आंदोलन पुकारली आहे.

दरम्यान याच विधेयकावरून आता नगरमध्ये एक आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, केंद्रातील भाजप शासनाने संमत केलेल्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ तसेच विधेयकातील त्रुटी सुधारून शेतकर्‍यांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे

या मागणीसाठी शेतकरी संघटनेद्वारे शुक्रवारी-२ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करण्यात येणार आहे. याची माहिती देताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, केंद्र शासनाने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे.

शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार शेतकर्‍यांसाठी बाजारपेठ खुली होत आहे व हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांना शेतीमाल व्यापाराचे स्वातंत्र्य सरकार देत आहे. मात्र, आवश्यक वस्तू कायद्यातून वगळलेल्या वस्तू भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या विधेयकातील तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध आहे.

या तरतुदीमुळे शेतीमाल व्यापारावर अनिश्चिततेची टांगती तलवार राहणार आहे. या तरतुदीमुळे शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार व गुंतवणुकदार सर्वांचाच तोटा आहे. कायदा तयार करताना सरकारने ही दुरुस्ती करावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान २ ऑक्टोबरला महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकर्‍यांनी महात्मा गांधी किंवा लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळयासमोर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चिंतन प्रबोधन करावे व त्यानंतर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात येइल, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24